मोक्ष
मोक्ष म्हणजे नेमकं काय
मोक्ष म्हणजे नेमकं काय
मेल्यानंतरही कळालं नाही
चितेवर प्रेत धुसमुसतयं
पण, नीटसं ते जळालं नाही
अर्धा जळालो अर्धा उरलो
मोक्षासाठी भटकत राहिलो
स्मशानात पिंपळाच्या झाडावर
मग उलटा लटकत राहिलो
उलटं लटकूनही मला
खालचं जग सरळ दिसायचं
स्मशानात येणाऱ्या प्रत्येकावर
माझं मग बारकाइनं लक्ष असायचं
प्रेत उतरवताच खांद्यावरुनी
खांधेकरांना हायसं वाटायचं
गेलेल्या व्यक्तीच्या दु:खा पेक्षा
त्याचं ओझं जास्त वाटयचं
मग आपआपसात चर्चा सुरू व्यायची
माणुस मनानं हा खरा होता
हरामचा पैसा जरा जास्त खाल्ला
नाहीतर स्वभावानं बरा होता
चर्चा त्यांची चालू रहायची
विषयांचीही गर्दी वाढायची
चिता मात्र त्या ज्वलात
शेवटचं एकटीच लढायची
गर्दी निघून जायची, आणि
प्रेत राख होऊन मातीत मिसळायचं
मग एखादं अर्ध जळालेलं प्रेत
माझ्या शेजारी येवून लटकायचं

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home